सणांसाठी रस्त्यावर उतरू नका, प्रताप सरनाईकांसारखी आंदोलने करा!

सणांसाठी रस्त्यावर उतरू नका, प्रताप सरनाईकांसारखी आंदोलने करा!

मुख्यमंत्र्यांनी दिला महाराष्ट्रातील जनतेला सल्ला

नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेने केलेली आंदोलने, राडेबाजी, ही आंदोलने केल्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली शाबासकी, केंद्र सरकारविरोधात निघालेले मोर्चे, विविध उद्घाटन कार्यक्रमांच्या निमित्ताने गोळा झालेला जमाव, स्वतः आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब सहपरिवार पांडुरंगाचे घेतलेले दर्शन या साऱ्या घटना विसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाविरुद्ध आंदोलन करण्याची हाक महाराष्ट्रातील जनतेला दिली.

ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यामार्फत उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पांच्या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यानी सणांसाठी आंदोलने करण्यापेक्षा प्रताप सरनाईकांसारखी ‘आंदोलने’ करा असा सल्ला दिला.

केंद्राने आम्हाला पत्र लिहून खबरदारी घेण्यास सांगितले आहे. ते पत्र हवे तर दाखवतो. आम्ही ८० टक्के समाजकारण करतो आणि २० टक्के राजकारण. पण आमच्याविरोधात १०० टक्के राजकारण सुरू आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारने राजकारणापासून फारकत घेतल्याचे निक्षून सांगितले.

हे काही स्वातंत्र्याचे आंदोलन नाही

कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्दैवी आहे. सणांसाठी केले जाणारे आंदोलन हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, असे त्यांनी सांगितले.

आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे, असे सांगून येत्या काळात येणारे सणही सर्वसामान्यांना पूर्णपणे साजरे करता येणार नाहीत, याचेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी, असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे.

Exit mobile version