गेले काही दिवस लसीकरण केंद्रावर सुरू असलेला गोंधळ आणि नियोजनातील ढिसाळपणा याची दखल घेऊन लसीकरणावर काही ठोस तोडगा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी झालेल्या फेसबुक लाइव्हमध्ये सुचविला जाईल, अशी अपेक्षा होती, पण या भाषणातून तसे काही स्पष्ट न झाले नाही. केवळ लसीकरणच नव्हे तर इतरही अनेक मुद्द्यांच्या बाबतीत कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकले नाही. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना १ मे पासून लसीकरण केले जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पण त्यामुळे आधीच ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांची जी परवड होते आहे, त्यात आता या नव्या वयोगटातील लोकांची भर पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला.
हेही वाचा:
जिहादी उस्मानी विरोधात नेटकऱ्यांचा संताप
निर्भीड पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी
लागोपाठ दोन शरीरसौष्ठवपटू करोनाने गेले!
१ मेपासून मोफत लसीकरणाची घोषणा महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जोशात केली होती, तेव्हापासून सुरू असलेला लसीकरणाचा घोळ अजूनही कायम आहे. अजूनही केंद्र सरकारकडून लस उपलब्ध होत नाही, याकडेच मुख्यमंत्र्यांनी बोट दाखविले. आम्ही तर दररोज १० लाख लोकांचे लसीकरण करण्यासही तयार आहोत एवढेच नव्हे तर १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी जनतेसाठी १२ कोटी डोस एकरकमी धनादेश देऊन विकत घेण्याचीही महाराष्ट्राची तयारी आहे हे सांगताना लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही, असे सांगून त्यांनी केंद्रच कसे लशीच्या तुटवड्याला जबाबदार आहे यावर भर दिला. सध्या भारतात दोनच कंपन्या लस उत्पादनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या उत्पादनातील ५० टक्के वाटा केंद्राला तर ५० टक्के खासगी रुग्णालये व खुल्या बाजारात जाणार आहे. त्यामुळे अपेक्षित लस उपलब्ध होत नाही, असे सांगून आपली हतबलताही त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. आताही आमच्याकडे ३ लाख लशी आहेत. त्या आम्ही देऊ. मे महिन्यात १८ लाख लसी मिळणार आहेत. पण त्याची तारीख माहीत नाही. या व्यतिरिक्त ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीचा नियमित पुरवठा करत राहणार आहोत. मी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे की, आम्हाला अॅप तयार करण्याची परवानगी द्या. ते झाले तर सुविधा वाढेल, असे सांगताना केंद्राकडून अल्प पुरवठा होत असल्याचेच ते पुन्हा बोलले.
लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका नाहीतर ही लसीकरण केंद्रेच करोना प्रसारक मंडळे बनतील, असे सांगून गेल्या काही दिवसांत लसीकरणाच्या व्यवस्थेतील सरकारच्या त्रुटी त्यांनीच दाखवून दिल्या.
रेमडेसिवीरची मागणी वाढली असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राच्या हातात हे वितरण आहे. केंद्राने २६ हजार रेमडेसिवीरची व्यवस्था केली होती पण आपली मागणी ५० हजारांची मागणी होती. पंतप्रधान मोदींकडे मागणी केल्यावर ३५ हजारापर्यंत इंजेक्शन मिळत आहे. त्याचे आपण पैसे मोजत आहोत. रेमडेसिवीरचा वापर मात्र आवश्यक तिथेच करा. असे सांगताना रेमडेसिवीरच्या बाबतीतही केंद्राचाच कसा अडथळा आहे, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.