सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून एक प्रकारे हा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सचिन वाझे, परमवीर सिंह ही छोटी माणसं आहेत, त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आता भाजपा नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे.
माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. (२/२)
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 17, 2021
“सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे, क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे, त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली होणे. माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वइतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे, मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.” अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?
अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी
परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर
देवेंद्र फडणवीस यांनी वाझेप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करताना सरकारला धारेवर धरलं. एटीएसकडे हिरेन प्रकरणाचा तपास गेल्यानंतर एटीएसने वाझेंना अटक करायला हवी होती. वाझेंना अटक करून एटीएसने त्यांना एनआएकडे द्यायला हवं होतं. पण एटीएसने तसं केलं नाही. हिरेन आणि अँटालिया प्रकरण हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हिरेन प्रकरणाचा एनआयएने तपास करावा, असं सांगतानाच एटीएसवर आमचा अविश्वास नाही असं नाही, एटीएसवर विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, तशी या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण एनआयएकडे देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं.