कांदिवलीचा रहिवासी असणारा निलेश तेलगडे याचीही पालघर येथे झालेल्या साधूंच्या मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली. निलेशच्या मृत्यनंतर उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कारूळकर प्रतिष्ठानने मदत दिली. त्यांच्या दोन मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलल्याचे कारूळकर प्रतिष्ठानने जाहीर केले. ऐन लॉक डाउन मध्ये तेलगडे कुटुंबियांच्या घरी जाऊन कारूळकर प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत कारूळकर यांच्या पत्नी शीतल कारूळकर यांनी नीलेश यांच्या पत्नीला रोख मदत दिली. दिलेल्या शब्दप्रमाणे यावर्षी देखील तेलगडे कुटुंबियांना मदत करण्यात आली. कारूळकर प्रतिष्ठानच्या बोरिवली येथील कार्यालयात शीतल कारूळकर यांनी ही मदत पुजा तेलगडे यांना दिली. पुजा तेलगडे यांच्या दोन्ही मुलींच्या यावर्षीच्या शिक्षणासाठी संपूर्ण मदत त्यांना देण्यात आली.
गेल्या वर्षी पालघर येथे मॉब लिंचिंगची घटना घडल्यानंतर अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी निलेश तेलगडे यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. सरकारकडून देखील त्यांना काही देण्यात आले नाही. असे असताना, आता या प्रकरणाची कुठेही चर्चादेखील नसताना आठवणीने पुजा तेलगडे यांना कारूळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयात बोलावून त्यांची विचारपूस करून, त्यांना त्यांच्या मुलींच्या या शैक्षणिक वर्षासाठी मदत देण्यात आली. त्याबरोबरच मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील कारूळकर प्रतिष्ठानने उचलली आहे.
हे ही वाचा:
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता
संजय राऊत कोणाचे, शिवसेना की राष्ट्रवादी?
पुजा तेलगडे यांनी सांगितले की, निलेश यांच्या हत्येनंतर अनेक कारूळकर प्रतिष्ठानने त्यांना खूप मदत केली. त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च कारूळकर प्रतिष्ठानने उचलला. गेल्या वर्षी देखील त्यांना अशाच प्रकारे मदत देण्यात आली होती.
यावेळी पुजा यांनी असे देखील सांगितले की, ‘गेले अकरा महिने आम्हाला कोणी विचारतही नाही. आमच्याशी कोणी संवाद देखील साधला नव्हता ती संधी आम्हाला कारूळकर प्रतिष्ठानमुळे मिळाली.’ त्याबरोबरच त्यांनी ‘माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला त्याचा मृतदेह देखील नीट पाहता आला नाही. त्यानंतर आज आम्ही थोडेबहुत काम करून कसेबसे घर चालवत आहोत. परंतु कोणीही काही विचारत नव्हते.’ अशी खंत देखील व्यक्त केली. ‘कारूळकर प्रतिष्ठानने आम्हाला बोलावले, विचारपूस केली; आमच्याशी संवाद साधला, याचं आम्हाला फार बरं वाटलं.’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
पूजा तेलगडे यांनी त्यांच्या नवऱ्याला न्याय मिळेपर्यंत शांत राहणार नाही असा निर्धार देखील बोलून दाखवला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीटरवरून पत्र देखील पाठवले परंतु त्यांनी सामान्यपणे नुसतं धन्यवाद दिलं, परंतु आम्हाला न्याय कधी देणार असा सवाल देखील त्यांनी केला. त्याबरोबरच त्यांनी सीबीआय चौकशी कधी होणार? असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पूजा तेलगडे यांना अजूनही निलेश तेलगडे यांचे मृत्यु प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली. त्याबरोबरच वकिल आपल्या काही प्रश्नांची नीट उत्तरे नीट देत नाही. काही लोक सुटलेले कळल्यावर आपण वकिलाशी संपर्क करायचा प्रयत्न केला असता, तुम्ही काळजी करू नका अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याबद्दल त्यांनी नापसंती सुद्धा व्यक्त केली होती.
यावेळी बोलताना पूजा यांनी आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी देखील मिळावी जेणेमुळे घर चालवायला मदत होईल. सध्या आम्ही घरी काम करून कसेतरी घर चालवत आहोत. माझा दीर देखील रिक्षा चालवून घराला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. मी सुशिक्षित असल्याने नोकरी मिळाली तर घर चालवणे बरे होईल. अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.