महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली असून भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. यावेळी नव्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.
राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदाची गौरवशाली परंपरा असून पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार आहोत. आतापर्यंत अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा जपली आहे, आताही ती जपली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
अधिवेशनात भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत कौतुक केले आहे. शिवसेनेच्या सामान्य सैनिकाला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री केले. काही अपेक्षा न ठेवताच फक्त बाळासाहेबांचे विचार पुढे चालावेत म्हणून बंड पुकारले होते. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी मला जनतेसाठी काम करण्याची संधी दिली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.
हे ही वाचा:
विधानभवनातील शिवसेना कार्यालय सील
विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर यांची प्रचंड बहुमताने निवड; राजन साळवींना फक्त १०७ मते
पंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर
अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून दावा करण्यात येत होता की, आमदारांना फसवून गुवाहाटीला घेऊन गेले आहेत. याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात दिले आहे. ते म्हणाले, कोणत्याही आमदारावर जबरदस्ती झालेली नाही. आमदारांना अनेक प्रलोभन दाखवली पण आम्ही ५० जण एकत्र आलो. या आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एकीकडे राज्यातले मोठे नेते तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सैनिक होता, मात्र असे असूनही आमचा विजय झाला आहे.