सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक घडलेले मुद्दे, प्रसंग मोडतोड करून पसरवले जात आहेत. शासन मराठा आरक्षणासंदर्भात संवेदनशील असताना समाजात सोशल मीडियातून गैरसमज पसरविणे आणि व्हीडिओ चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरवणे हे खोडसाळपणाचे आहे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांची कानउघाडणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यासाठी आले. तेव्हा मुख्यमंत्री खुर्चीवर बसण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले की, आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी माईक सुरू असल्याचं सांगितलं तर अजित पवार येस. असे म्हणाले. पण हा व्हीडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल करण्यात आला. त्यावरून सरकार कसे मराठा आरक्षणाच्या बाबतीत असंवेदनशील आहे. बोलून मोकळं होणारं आहे, अशी टीका करण्यास सुरुवात झाली.
त्यावरून मग मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, सह्याद्रीत आमची बैठक झाल्यावर आम्ही पत्रकारांशी चर्चा करण्यासाठी आलो. तेव्हा आम्ही फक्त सकारात्मक मुद्द्यांवर बोलू, राजकीय बोलणे नको, अशी भूमिका घेतली. तेवढं बोलून आपण निघू असा आमचा संवाद झाला. पण हा व्हीडिओ जाणीवपूर्वक दाखवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजात नाराजी पसरेल असा प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोकांकडून कऱण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार प्राधान्याने काम करत आहे. सरकार एवढी चांगली भूमिका घेत असताना काही जणांनी खोडसाळपणे व्हीडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात संभ्रम पसरविला आहे. राज्यातील सकारात्मक वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न काही जण करत आहेत. त्यांनी हे काम करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
हे ही वाचा:
बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन
उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब
वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांची अनोखी जाहिरात
फिरकी गोलंदाज कुलदीप ठरला वेगवान
गुरुवारी मनोज जरांगेंची पत्रकार परिषद
दरम्यान, जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी गुरुवारी ११.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आम्हाला भेटायला येणार होते, पण आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. आम्ही एक महिन्याची मुदत त्यांना दिली. आम्ही सरकारला वेठीस धरलेले नाही. ते आले नाहीत तरी आम्ही नाराज होणार नाही.