२०१९ला जोडे पुसायला कोण गेले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

२०१९ला जोडे पुसायला कोण गेले होते?

उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचे काय होणार? असे वक्तव्य करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. मात्र त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर देत २०१९ला जोडे पुसायला कोण गेले होते, याचे उत्तर द्या असा खरमरीत सवाल विचारला.

ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचा सूड आम्ही घेऊ, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपण आता बदला घेण्याच्या तयारीत आहोत, हे सांगितले. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, “२०१९ ला जोडे पुसायला कोण गेलं होतं? जोडे पुसायला गेले होते की जोडे धुवायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा सर्वसामान्याबद्दल द्वेष, मत्सर आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला, भाजीवाला हे सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा अशाप्रकारची पोटदुखी होते. सर्वसामान्य माणूस हा जोडे पुसरणारा मेहनती, प्रामाणिक असतो. तुमच्यासारखा विश्वासघातकी नसतो. त्यामुळे अशाप्रकारचा माजोरडेपणा करणाऱ्यांना जनता नक्कीच मतदानातून चोख उत्तर देईल”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

हे ही वाचा:

देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये होणार सुरू

मुंबई क्रिकेट क्लब, अवर्स यांच्यात अंतिम झुंज

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला. काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

शिंदे यांनी अनेकवेळा ठाकरे गटावर शाब्दिक हल्ला केला आहे पण यावेळी प्रथमच ट्विटरवर दीर्घ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्याच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Exit mobile version