देश चंद्रावर जातो आहे. काही लोक मात्र अजूनही घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाइन पद्धतीने करत होते. पण आम्ही त्यांना एकच करंट दिला, एकच झटका दिला. आम्ही त्यांना ऑनलाइनवरून लाइनवर आणण्याचे काम केले, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टीका केली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात परभणी येथे शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या कार्यक्रमात होते.
रविवारचा दिवस मोठमोठ्या सभांचा होता. परभणीतील या मेळाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते तर नंतर अजित पवार यांची बीडमध्ये सभा झाली. राज ठाकरे यांनीही मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी पक्षाने केलेल्या जागर पदयात्रेवेळी भाषण केले. उद्धव ठाकरेंनीही हिंगोलीत नेहमीप्रमाणेच सत्ताधारी पक्षांवर टोमण्यांचे अस्त्र सोडले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही कामाला महत्त्व देतो. हे मात्र दिवसरात्र भोंगे लावतात. एखादी चांगली सूचना करण्यासाठी यांचा भोंगा कधी वाजलाच नाही. नेहमी फक्त शिव्या देण्यासाठी, आरोप करण्यासाठीच हे भोंगे वाजत असतात. पण शासनाचा भोंगा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाजत आहे. शासन सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांचा स्फोट; कारखान्याचे छप्पर उडाले, ८ ठार
भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक
धारावीत अजगर घुसला; घरातल्या पाळीव सशालाच गिळले
एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
एकही विरोधक विकासावर बोलत नाही
देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त टीका करतात. सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू असतात रात्री १० पर्यंत भोंगे सुरू असतात. टीकेला आम्ही घाबरत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी हे आम्ही मानतो. मी पण विरोधी पक्ष नेता होतो. पण ज्यावेळी सरकारवर टीका केली तेव्हा चांगले काय झाले पाहिजे हे सांगितले. पण हे तसे काहीही सांगत नाही. चांगले काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे हे मी सांगतो. खरे म्हणजे हा राजकीय मंच नाही. यांच्यातला एकही नेता विकासावर एकही शब्द बोलत नाही. तुमच्या भाषणाने शेतमजुराच्या पोटात घास जाणार नाही. सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन करायचे असेल तर महायुतीचे सरकार हे परिवर्तन करते आहे. तुम्ही आमच्याकडे बोटे दाखवून कल्याण करू शकणार नाही. जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत आम्ही तिघे स्वस्थ बसणार नाही.
उद्धव ठाकरेंनी जुनेच मुद्दे काढले उकरून
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचीही हिंगोलीत रविवारी सभा झाली. त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावर आपला राग काढला. नेहमीप्रमाणे टोमणे मारताना आणि जुनेच मुद्दे उकरून काढताना ते म्हणाले की, माझा पक्ष फोडला आणि आता माझे वडील वापरायचे आहेत. भाजपाच्या नेत्यांमध्ये नेते तयार करण्याची ताकद नाही. माझे वडीलच यांना लागतात. भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची दया येत असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पण त्यांना काय मिळाले.