शनिवार,१७ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर टीका केली आहे. काम करणाऱ्यांची चर्चा होते आणि बिनकामाचे मोर्चे काढतात, असा खोचक टोला त्यांनी मविआला लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची रत्नागिरीत प्रमोद महाजन संकुलात सभा पार पडली. यावेळी शिंदे गटात अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला. तेव्हा एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे.
ते म्हणाले, आपण धडाकेबाज निर्णय घेत आहोत. पण, ते रस्त्यावर येत आहेत, मोर्चा काढतील. आपण काम करणारे आहोत. काम करणाऱ्यांचीचं चर्चा होते आणि बिनकामाचे मोर्चा काढतात, असा टोलाच त्यांनी मविआला लगावला आहे.
ठाकरे गटावर टीका करताना शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि त्यांची भूमिका आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपा युती म्हणून आपण एकत्र निवडणुका लढवल्या. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून मतं मागितली. लोकांनी पूर्ण युतीला बहुमत दिले. त्यामुळे लोकांच्या मनातलं आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं. मग, काय चुकलं आमचं? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
हे ही वाचा :
२०२३ च कालनिर्णय घेतलात का ? मग ही बातमी तुमच्या साठी
चक्क एलोन मस्क तोट्यात, ते ही इतके डॉलर?
महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार
राज्यात आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धाचं लागली आहे. त्याला आम्ही कामातून उत्तर देऊ. पण, ज्यांना खोके माहिती आहेत, तेच खोक्याची भाषा करतात. खोके कुठून कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत. आम्ही घेणारे नाहीत, देणारे आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.