विरोधक सातत्याने राज्यातील शिंदे-भाजप सरकार पडण्याच्या वल्गना करत आहेत. खासदार संजय राऊत तर एखाद्या ज्योतिषाप्रमाणे सरकार पडण्याच्या तारखा वारंवार जाहीर करत असतात. विरोधकांच्या या कल्पनाविलासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. आमचं सरकार लोकांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे सरकार पडण्याची भीती माझ्या मनात नाही. मला कसलीही भीती वाटत नाही, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकार जाणार की राहणार? याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यावर पहिल्यांदाच हे विधान करून विरोधकांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.
‘टीव्ही ९ मराठी’ वाहिनीने दादरच्या वीर सावरकर स्मारकात महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरे दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्याकडे मेरिट आहे. ४० आमदार आमच्यासोबत आहेत. १२ खासदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. कोर्टाने मेरिटवर निर्णय घ्यावा, हीच आमची भूमिका आहे. आम्हाला सरकार पडण्याची भीती नाही. आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळेच मी कोर्टाच्या कोणत्याही निर्णयावर भाष्य करत नाही. काही बोलत नाही. कोर्टाला जो निर्णय द्यायचा तो कोर्ट देईल. कोर्टाने काय निर्णय द्यायचा हे आपल्या मनावर नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्हाला मुंबई चकाचक करायची आहे. त्यामुळे आम्ही पटापट निर्णय घेतले आहेत. त्याचीच काही लोकांना पोटदुखी होत आहे. पण मी अशा टीकांकडे लक्ष देत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा कामावर भर आहे. ते मी करत राहणार. मागच्या सरकारमध्ये मीही होतो. पण तेव्हा निर्णय घेण्याची संधी नव्हती. आता संधी आहे. त्यामुळे आम्ही पटापट निर्णय घेत आहोत. आमचं सरकार हे गतीमान सरकार आहे. निवडणुका येतील आणि जातील. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
लोक हल्ली सर्वोच्च न्यायालयालाही सल्ला देतात
काही लोक हल्ली सर्वोच्च न्यायालयालाही सल्ला देत सुटलेत. पूर्वी ते उच्च न्यायालयाला सल्ला देत होते. ज्यांची बाजू भक्कम नसते, तेच लोक मीडियासमोर येऊन आपली बाजू भक्कम असल्याचं सांगत असतात, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे लगावला. आमच्याकडे बहुमत आहे. बहुमतामुळेच शिवसेना आणि धनुष्यबाणावर आम्ही दावा केला आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.