मुंबईतील वरळी कोळीवाडा भागात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोस्टल रोड संबंधित प्रकरण मार्गी लागले आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळी वाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली आहे. बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तसेच याभागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. गुरुवार, १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल व कोळी बांधव उपस्थित होते.
वरळी कोळीवाडा येथील सी लिंकला हा कोस्टल रोड जोडला जाणार आहे. सी लिंक येथील क्लीव्ह लॅण्ड बंदर जवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टर पिलर मधील अंतर वाढविण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांनी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोळीबांधवांची बैठक घेतली होती. त्यामध्ये या मागणीबाबत तज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच त्यानुसार सात सदस्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने महिनाभरात अहवाल देत अंतर ६० वरून १२० मीटर करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोळी बांधवांची पिलरमधील अंतर वाढविण्याची मागणी मान्य करीत या पिलरमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय जाहिर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, कुठल्याही विकास प्रकल्पाला गती देताना स्थानिकांची नाराजी असू नये अशी सरकारची भूमिका आहे. आम्ही लोकहिताच्या निर्णयाला नेहमीच प्राधान्य देत आहोत, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
त्यानुसार कोळी बांधवांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला आहे. पिलरमधील अंतर वाढवल्यानंतर कोळी बांधवांच्या बोटी त्याभागातून सहजपणे ये-जा करू शकतील. यावेळी कोळीवाड्यांचे सीमांकन, पुनर्विकास आदीबाबत चर्चा झाली. कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरच पूर्ण होईल, असे सांगत कोळीवाड्यांचे हक्क अबाधीत राहतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले.
हे ही वाचा :
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?
संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला
हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीवरम सकारात्मक निर्णयामुळे कोळी बांधवांच्या स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.