दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

पालिकेकडे दोघांनीही शिवाजी महाराज पार्कसाठी केले अर्ज

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक टोकदार होत असताना आता त्यात दसरा मेळाव्याच्या सभेची भर पडणार आहे. या सभेसाठी दोन्ही गटांकडून अर्ज करण्यात आल्यामुळे दादरच्या शिवाजी महाराज पार्क उद्यानात कुणाचा आवाज घुमणार याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.

 

पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. त्यादरम्यान पालिकेची निवडणूकही घोषित होऊ शकते. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत.

 

 

गेल्या वर्षीही दसरा मेळाव्यावरून या दोन गटात खटके उडाले होते. यावेळीही शिवाजी महाराज पार्क येथे कोण मेळावा घेणार यावरून वातावरण तंग होणार आहे. दोन्ही गटांनी या मैदानासाठी अर्ज केला आहे. महिन्याभरापूर्वीच या दोन्ही गटांनी शिवाजी महाराज पार्क मैदानासाठी अर्ज केला आहे. आता त्याबाबतीत नेमका निर्णय काय होते, कुणाला दसरा मेळाव्यासाठी हे मैदान बहाल होते हे पाहायचे.

 

 

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समीकरण पक्के आहे. पण शिवसेनेत गेल्या वर्षी फूट पडल्यानंतर मात्र या मैदानावर कुठला गट हक्क मिळवू शकतो, हा कुतुहलाचा विषय बनला आहे.

हे ही वाचा:

१७ वर्षीय पलकने सुवर्ण तर ईशा सिंगने रौप्यपदकावर कोरले नाव !

पुणेकर सुनील देवधरांचे वाढदिवसानिमित्त प्रशांत कारुळकरांकडून अभिष्टचिंतन

इम्रान खानचे वकील आणि पीएमएल-एन सिनेटर यांच्यात टीव्ही शोमध्ये ठोसेबाजी

मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश

 

त्यातच आता शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. त्यामुळे यंदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिवाजी महाराज पार्कवर मेळावा घेण्यासाठी आग्रही असणार यात शंका नाही. मागील वेळेस दोन्ही गटांनी अर्ज केले होते पण पालिकेने दोघांचेही अर्ज फेटाळले. त्यानंतर ठाकरे गट न्यायालयात गेला होता. तिथे न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानात मेळावा घेण्यास ठाकरे गटाला परवानगी दिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बीकेसी येथे मेळावा घ्यावा लागला होता. दोन्ही मेळावे मात्र एकापाठोपाठ एक सुरू झाले.

 

 

 

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे आणि ४० आमदार उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून बाहेर पडले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर या दोन गटात वेळोवेळी कडवा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मात्र या दोन गटांमुळे शिवसेनेचे दोन मेळावे एकाचवेळी होण्याची वेळ गेल्यावर्षी ओढवली. आगामी निवडणुका पाहता हा मेळावा दोघांसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. तेव्हा तो कुणाला शिवाजी महाराज पार्क मैदानात आयोजित करता येतो, हे येत्या काही दिवसांत कळेल. दोन्ही गट आपापले शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहेत.

Exit mobile version