भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन बीएमसीवर आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. “१ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून गेले ३ महिने जी वास्तू वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज (५ ऑगस्ट) करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत झाली आणि कार्यक्रमाचं हसं झालं. असा प्रकारचं दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
“आज एच पश्चिम महापालिका कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. जुनी वास्तु अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडे गेले ६ वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला आहे. या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर, प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत 8 वेळा बैठका घेतल्या.” असं आशिष शेलार म्हणाले.
तीन महिने वापरात असणाऱ्या एच वेस्ट पालिका कार्यालयाच्या वास्तूचे नव्यान उद्धाटन!
मा. मुख्यमंत्र्यांची ही फसगत कशाला?
शिवसेनेचा या कामात कसलाही सहभाग नाही. स्थानिक संस्था, एएलएम, नागरिकांच्या पाठपुराव्याने हे काम झाले.
तर मग सत्ताधाऱ्यांचा श्रेय घेण्यासाठी एवढा अट्टाहास कशाला? pic.twitter.com/5irDiPEZFz— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2021
“या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. स्थानिक आमदार, एएलएम, संस्था, नागरिकांची मागणी आणि पाठपुराव्याने ही नवी अद्ययावत इमारत उभी राहिली. १ मे पासून ती लोकांसाठी खुलीही करण्यात आली. आता अचानक ३ महिने वापरात असलेल्या इमारतीचे लोकार्पण आज (५ ऑगस्ट) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे,” असंही आशिष शेलार यांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल
श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ
“महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन दाखवलेच्या नादात उद्या अचानक गेट वे आँफ इंडियाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करु नये म्हणजे मिळवले,” असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.