वसईच्या राजवली वाघरल पाडा येथे बुधवार, १३ जुलै रोजी सकाळच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यातील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याचे निर्देश पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी २ लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी ६ लाख मदत केली जाणार आहे. याशिवाय जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून
गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक
अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार
मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात
वसई पूर्वेकडील राजवली वाघरळपाडा येथे मुसळधार पावसामुळे अचानक दरड घरावर कोसळली. या दुर्घटनेत वंदना अमित ठाकूर (३३), ओम ठाकूर (१०), अमित ठाकूर (३५), रोशनी ठाकूर (१४) हे चौघे ढिगाऱ्याखाली दबले गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वंदना आणि ओम या दोघांना सुखरूप सुखरूप बाहेर काढले. जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. तर एनडीआरएफचे पथक, श्वान पथक अग्निशमन दलाच्या मदतीला आले आणि त्यांनी अमित व रोशनी यांनाही बाहेर काढले मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.