नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटकपक्ष नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबाबत नापंसती व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. “महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असतानाच त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती.” अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे.
नाना पटोले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राजीनामा द्यायला सांगितल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.” अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली. “पाणी वाहतं राहिलं तर ते स्वच्छ असतं. यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारेन आणि त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार मी तुमच्या सगळ्यांसमोर राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तीनही पक्षांचे हाय कमांड निर्णय घेईल”, असेही पटोले म्हणाले.
परंतु या निर्णयामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सहमती नव्हती का? जर होती तर आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार नाराज का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.