केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी झोईश ही गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील एका बेकायदा रेस्टॉरंटमुळे वादात अडकली होती. तसेच या रेस्टॉरंटमध्ये गोमांस मिळत असल्याची बाब समोर आल्यानंतर स्मृती इराणीही या वादात सापडल्या होत्या. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीला या प्रकरणात क्लीनचीट दिली आहे.
“केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची कन्या झोईश इराणी या दोघीही गोव्यातील रेस्टॉरंटच्या मालक नाहीत. दोघींनी या रेस्टॉरंटच्या परवान्यासाठी कुठलाही अर्ज केलेला नाही, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. हे रेस्टॉरंट किंवा त्याच्या जागा या दोन्हींपैकी एकही गोष्ट स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीच्या मालकीची नाही,” असं दिल्ली उच्च न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, स्मृती इराणी यांच्या मुलीने यापूर्वीच वकिलांमार्फत हे आरोप फेटाळून लावले होते. गोव्यातील या रेस्टॉरंटचे आपण मालकही नाही आणि ते चालवतही नाही, असं तिने स्पष्ट केले होते. तर ही लढाई न्यायालयात लढणार असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.
हे ही वाचा:
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले
माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं
कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?
झोईश हिने बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले, असा आरोप काँग्रेसचे मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केला होता. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणींना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणीही त्यांनी केली होती.