प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासनिधी बाबत केलेल्या वक्तव्यानंतर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. मात्र, अखेर निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. प्रचारसभेत विकासनिधीवरुन केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं भाषण चर्चेत आहे. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचं नाव नव्हतं असे म्हणत क्लीनचीट देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
सियाचीनजवळ चीनव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ता बनवण्याचा प्रयत्न
‘अमेरिकेचा मानवाधिकार अहवाल अत्यंत पक्षपाती’
लंडनमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला करणारा अटकेत
बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा, अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शरदचंद्र पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी कविता द्विवेदी यांच्याकडून करण्यात आली. प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही, असे कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.