ईडीचा दावा; अरविंद केजरीवाल मद्यधोरण घोटाळ्याचे प्रमुख

१० दिवसांच्या कस्टडीची मागणी

ईडीचा दावा; अरविंद केजरीवाल मद्यधोरण घोटाळ्याचे प्रमुख

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटकेपासून संरक्षण करणाची याचिका फेटाळली होती. शिवाय ईडीने न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले होते. त्यांनतर गुरुवारी रात्री ९ च्या दरम्यान केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर ईडीने केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केले असून अनेक धक्कादायक आरोप करत दावे केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळ्याचे प्रमुख असून त्यांची १० दिवसांची कस्टडी ईडीने मागितली आहे. निवडणूक लढवण्यासाठी केजरीवाल यांनी मद्यव्यापाऱ्यांकडून १०० कोटी रुपयांचा निधी मागितल्याचा आरोप ईडीने केला असून त्यापैकी ४५ कोटी रुपये त्यांना चार वेगवेगळ्या मार्गांनी मिळाले आहेत. हा पैसा गोवा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पाठवण्यात आला होता, अशी माहिती ईडीने दिली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे ईडीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल हे गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यात गुंतले होते आणि धोरण तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता, असा आरोप करण्यात येत आहे. धोरणचं अशा रीतीने बनवण्यात आले होते की त्यामुळे लाच घेणे शक्य झाले. विजय नायर हे केजरीवाल आणि के कविता यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते, असे ईडीने सांगितले आहे. विजय हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ राहत होता. त्यांच्याकडे प्रसारमाध्यमांची जबाबदारी होती. तसेच कविता यांनी आम आदमी पार्टीला ३०० कोटी रुपये दिल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने या प्रकरणी न्यायालयात २८ पानांचा अहवाल सादर केला आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशमधील मदरसा शिक्षण कायदाच अवैध

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली

कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!

ईडीने अटक आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबाचा हवाला दिला. केजरीवाल यांना गोवा-पंजाब निवडणुकीसाठी निधी हवा होता, असा आरोप देखील ईडीने केला आहे. ईडीने न्यायालयात अनेक लोकांच्या चॅटचा पुरावा दिला आहे. ईडीने सांगितले की, अनेकांना मोठी रोकड देण्यात आली होती. लाचेची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली. तसेच हे प्रकरण १०० कोटी रुपयांचे नसून ६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ईडीकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा केला आहे. केजरीवाल हे या सर्व बाबींसाठी जबाबदार आहेत. केजरीवाल यांना अनेक समन्स बजावण्यात आले पण त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे पालन केले नाही. घराच्या झडतीतही त्यांनी योग्य तथ्य उघड केले नाही, त्यामुळे त्यांना अटक करावी लागली, असं ईडीने म्हटलं आहे.

Exit mobile version