अभिनेते सनी देओल म्हणतात, आता निवडणूक लढणार नाही!

२०२४मध्ये निवडणूक लढणार नाही

अभिनेते सनी देओल म्हणतात, आता निवडणूक लढणार नाही!

भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत २०२४ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा मनोदय जाहीर केला आहे. ‘आता अभिनेता राहणे हीच माझी निवडणूक आहे. मला वाटते, मी अभिनेता म्हणून देशाची सेवा करावी, जी मी करत आलो आहे. तुम्ही कोणतेही एक काम करू शकता. एकावेळी अनेक काम करणे अशक्य आहे. मी ज्या विचाराने राजकारणात आलो होतो, ती सर्व कामे मी अभिनेता म्हणूनही करू शकतो,’ असे सनी देओल यांनी स्पष्ट केले.  

‘अभिनयाच्या दुनियेत माझी जशी इच्छा आहे, तसे मी करू शकतो. मात्र राजकारणामध्ये मी दिलेले आश्वासन पूर्ण करू शकत नसेन तर ते मला सहन होणार नाही. मी असे नाही करू शकत,’ असे ते म्हणाले.

सनी देओल यांनी संसदेच्या कामकाजात केवळ १९ टक्के उपस्थिती दर्शवली आहे. याबाबतही त्यांना विचारण्यात आले. ‘मी जेव्हा जेव्हा संसदेत जातो, तेव्हा तेव्हा बघतो की, येथे देश चालवणाऱ्या व्यक्ती बसल्या आहेत. सर्व पक्षांचे नेते बसले आहेत. मात्र ते कसे वागत आहेत? आपण दुसऱ्यांना सांगतो की, अशी वर्तणूक करू नका, आणि ते स्वत:च तशी वर्तणूक करतात. जेव्हा मी हे पाहतो, तेव्हा असे वाटते की, मी असा नाही. त्यापेक्षा मी कुठेतरी दुसरीकडेच जाणे योग्य ठरेल. त्यामुळे मी कोणतीही निवडणूक लढू इच्छित नाही,’ असा मनोदय त्यांनी जाहीर केला.

हे ही वाचा:

चांद्रयान ३ चंद्रावर नक्की उतरणार; माजी इस्रोप्रमुख सिवन यांना खात्री

सेवा नाहीत; मग कामगार रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट कशाला?

आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज

आठ कोटीच्या चिंधी घोटाळ्याचे धागेदोरेही कलानगरकडे बोट दाखवतायत…

अभिनेता सनी देओल यांनी सन २०१९मध्ये लोकसभा निवडणूक पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून लढवली होती. त्यांचा ८४ हजार मतांनी विजय झाला होता. त्यांनी गुरुदासपूर मतदारसंघातील मतदारांना विविध आश्वासने दिली होती. मात्र ही आश्वासने पूर्ण केली गेली नाहीत, तसेच ते मतदारसंघात फिरकलेही नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात गुरुदासपूर मतदारसंघात निदर्शनेही झाली होती. गुरुदासपूरमधील संत नगर मोहल्ला परिसरातील लोकांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सनी देओल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. ते तब्बल चार वर्षे गुरुदासपूर मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असा आरोप येथील स्थानिक अमरजोत सिंग यांनी केला आहे.

Exit mobile version