काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून रायबरेलीचा त्यांचा कौटुंबिक बालेकिल्ला ते कायम ठेवणार आहेत, असे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले. त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणुकीत पदार्पण करणार आहेत, अशीही माहिती खरगे यांनी दिली. राहुल गांधी यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघात म्हणजेच केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. ४ जून रोजी लागलेल्या लोकसभा निकालानंतर १४ दिवसांच्या आत राहुल गांधींना एक जागा सोडावी लागणार होती. आता राहुल गांधींनी रायबरेलीमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची बहीण प्रियांका वायनाडच्या रिक्त झालेल्या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.
‘राहुल गांधी लोकसभेच्या दोन जागांवरून जिंकले, परंतु कायद्यानुसार, त्यांना एक जागा सोडावी लागेल. राहुल गांधी रायबरेली राखतील आणि प्रियांका वायनाडमधून लढतील, असे आम्ही ठरवले आहे,’ असे खरगे यांनी जाहीर केले. ‘रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघांना दोन खासदार मिळतील. गांधी भावंडे या दोन्ही मतदारसंघांना वारंवार भेट देतील,’ अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.
‘प्रियांका गांधी निवडणूक लढवतील आणि मला विश्वास आहे की त्या निवडणुका जिंकतील. वायनाडचे नागरिक सांगू शकतील की, त्यांच्याकडे दोन खासदार आहेत. एक माझी बहीण आणि दुसरी मी. माझे दरवाजे वायनाडच्या लोकांसाठी नेहमीच खुले आहेत. वायनाडमधील प्रत्येक व्यक्तीवर माझे प्रेम आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले. तर, वायनाडच्या नागरिकांना राहुलची अनुपस्थिती जाणवू देणार नाही, अशी ग्वाही प्रियंका गांधी यांनी दिली.
‘वायनाडचे प्रतिनिधीत्व करता आल्याने मला खूप आनंद झाला आहे आणि मी त्यांना त्यांची (राहुल गांधींची) अनुपस्थिती जाणवू देणार नाही. मी कठोर परिश्रम करेन आणि सर्वांना आनंद देण्यासाठी आणि एक चांगला प्रतिनिधी होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझे रायबरेली आणि अमेठीशी खूप जुने संबंध आहेत आणि ते तोडता येणार नाहीत. मी रायबरेलीमध्ये माझ्या भावालाही मदत करेन. मी रायबरेली आणि वायनाड दोन्ही ठिकाणी असेन,’ असे आश्वासन प्रियांका गांधी यांनी दिले. या घोषणेनंतर लगेचच वायनाडमधील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रियांका गांधी यांचे दक्षिणेकडील राज्यात स्वागत करत घोषणाबाजी केली.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२
पोलीस भरतीची प्रक्रिया १९ जूनपासून होणार सुरु, गैरप्रकार आढळल्यास होणार गुन्हा दाखल!
महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती!
किरण शेलार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या
अमेठी, रायबरेली आणि वाराणसीसह अनेक लोकसभा जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ५२ वर्षीय प्रियांका गांधी यांच्या नाव चर्चेत होते. मात्र, आता त्या केरळमधील वायनाडच्या सुरक्षित मतदारसंघातून निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, प्रियांका लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्या तर पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत असतील.