‘जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय’

‘जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय’

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. सोमवारी (२५ ऑक्टोबर) त्यांनी वानखेडेंचा धर्म मुस्लिम असल्याचा खुलासा केला होता. तसेच शिवसेनेचे संजय राऊतांनी देखील समीर वानखेडे प्रकरणावरून टीका केली आहे. त्यावरूनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीकास्त्रे सोडली आहेत.

‘जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हे अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नसून मुसलमान आहेत, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची एवढी घाई का लागलेली आहे?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. ‘महाराष्ट्रात इतरही अनेक प्रश्न आहेत. कोकणातील वादळग्रस्तांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होत आहे. एमपीएससीच्या तरुणांचे भविष्य अंधारात ढकलेले जात आहे. दररोज राज्यातील लहान मुली, महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. या सर्व विषयांवर आपल्याला भाष्य करायचे नाहीये.’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘तुम्हाला एनसीबी सारख्या संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचे आहे. त्यांच्यावर वैयक्तीक हल्ले करून त्यांच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे’, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

‘अहमदनगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांना विरोध करणाऱ्यांची डोकी फोडली गेली. तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवर कारवाई करते आहे. यावरही तुम्हाला काहीच बोलायचे नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय,’ असे चित्रा वाघ म्हणाल्या. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार आणि निषेध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवाब मलिक हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे ते बोलतात म्हणजे सरकार बोलत असते. सर्व पुरावे समोर आल्यानंतर राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करावी. तसेच ही कारवाई होईपर्यंत समीर वानखेडे यांना अधिकारीपदी राहण्याचा अधिकार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी सामनामधून देखील भाजपवर टीका केली आहे.

Exit mobile version