गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन अद्याप सुरू आहे. राज्य सरकारने यावर कारवाई म्हणून कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरू केले आहे. यावरून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर घेत हाच का तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असा सवाल विचारला आहे.
‘ऐन दिवाळीत दोन हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचे पाप सरकारने केले आहे.’ असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘नोकरी घालवणे, उपाशी मारणे, बेघर करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे हाच महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. ‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे. निलंबन सरकारचा धिक्कार असो!’ असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय..
नोकरी घालवणं..
उपाशी मारणं..
बेघर करणं..
आत्महत्येस प्रवृत्त करणं..हाच का #MVA चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?
हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय#निलंबन_सरकार चा धिक्कार असो!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 12, 2021
शांततेत सुरू असलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने आक्रमक भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असून आज एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे नम्र आवाहन देखील केले आहे. मात्र, विलिनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही यावर कर्मचारी ठाम आहेत.