‘२५ हजार कोटींचे रस्ते कुणाचे? “ठग्स ऑफ बीएमसी”ला कोण वाचवतंय?’

‘२५ हजार कोटींचे रस्ते कुणाचे? “ठग्स ऑफ बीएमसी”ला कोण वाचवतंय?’

मुंबईतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते. तसेच रस्ते चांगले आहेत, त्यावर इतका खर्च केला जात असल्याचेही पालिकेकडून सांगितले जाते. तरीही नागरिकांना खड्ड्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येते. या रस्त्यांच्या डागडुजीसाठी तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. या संबंधित वृत्त ‘टेंडरनामा’ने आज प्रकाशित केले आहे. त्यावरूनच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या सर्व कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘मुंबईत २५ हजार कोटींचे रस्ते बनले पण हे रस्ते कोणते आहेत, खड्डे कुठे बुजवले, कंत्राटदार कोण आहे? याचा तपशील पालिकेने मांडलाच नाही. पालिका कोणाला पाठिशी घालत आहे. जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या “ठग्स ऑफ बीएमसी”ला कोण वाचवतंय?’ असा निशाणा साधत चित्रा वाघ यांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

याआधी शंभर कोटी रुपयांच्या घोटाळा बाहेर आला तेव्हा गृहमंत्री गायब झाले. आता २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर आलाय. आता नंबर कोणाचा?, असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

महापालिकेने मुंबईकरांसाठी बांधलेल्या रस्त्यांवर गेल्या १५ ते १८ वर्षात २२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याचा तपशिल महापालिकेने मांडला आहे. मात्र, या रक्कमेतील कामाचा तपशील लपवून ठेवल्याचे स्पष्ट आहे. नव्या जुन्या रस्त्यांच्या बांधणीनंतर डगडुजीच्या जबाबदारीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून याच रस्त्यांवर चार- सहा महिन्यांनी कोट्यवधी रुपयांची डागडुजी केली हे दाखविण्याचे धाडस महापालिकेतील अधिकारी करत आहेत. रस्ते चांगले आहेत आणि त्यावर इतका खर्चा केला जात असल्याचा दावा महापालिका करत आहे.

Exit mobile version