‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’

‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील परीक्षा आणि गोंधळ हे एक समीकरण तयार झाले आहे. आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. त्यावरूनच आता विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. सरकारला हे काम झेपत नसेल तर आता महाविकास आघाडी सरकारचं आऊटसोर्स करण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘न्यासा’ या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा एक दिवसापूर्वी रद्द करून पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. त्यानंतरही परीक्षा केंद्रावरूनही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरूनच चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘आरोग्य खात्याच्या परीक्षेत चौथ्यांदा गोंधळ. मूळ मुद्दा आऊटसोर्स केलेल्या एजन्सीवर चार चार वेळा मेहरबानी का? सरकारला हे काम झेपत नसेल, तर आता महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची वेळ आली आहे.’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

पुणे येथील केंद्रावर पर्यवेक्षक आणि प्रश्नपत्रिका नियोजित वेळेत पोहचल्याच नव्हत्या. तसेच नाशिक येथील केंद्रावर कमी प्रश्नपत्रिका पोहचल्या होत्या. तसेच मुंबईतही परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र होते. नर्सिंग आणि पॅरामेडीकलचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माधमातून शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘जेवढ्या मेहनतीने मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाला मंत्रिमंडळात ‘सेटल’ केले. त्यापेक्षा थोडे कष्ट या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी घेतले असते, तर हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य सेटल झाले असते…!’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

परीक्षा गोंधळावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यात आरोग्य भरती परीक्षेचा बाजार..! अंधाधूंद नियोजनशून्य कारभाराचा पुन्हा एकदा सामान्य विद्यार्थ्यी बळी. गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवयाला बरं येत सरकारला. यांना फक्त वसुलीचे सांगा पेपरच नको..!!!’ अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असे मोठे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

Exit mobile version