चित्रा वाघ यांनी केले स्पष्टीकरण
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने आज १२ एप्रिल रोजी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास भाग पाडल्याचे या तरुणीने म्हटले आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी या तरुणीने केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे, तसेच पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी या संपूर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे.
राजकारणात आणि समाजकारणात काम करताना नवनवे अनुभव येत असतात. त्याचेच उत्तर देण्यासाठी म्हणून आज पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात या तरुणीने सांगितले की, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केला. तसेच चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गर्भपात केला, अशी माहिती या तरुणीने पत्राने आणि प्रत्यक्ष भेटीत सांगितली. जेव्हा या तरुणीने माहिती सांगितली तेव्हा आपण महाराष्ट्रात नसल्याचे त्यांनी सांगितले.
या तरुणीला भेटल्यावर तिने २०१७ पासूनची तिची कहाणी मला सांगितली. त्यानंतर एक मुलगी एकटी लढतेय आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला जातोय असं लक्षात आल्यावर मी लढायचं ठरवले, असे चित्रा वाघ म्हणाल्या. या तरुणीने पुरावे दाखवले. पुरावे असताना आणि तिच्याकडून माहिती मिळाल्यानंतर लढली तर मी चूक केली का? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
या तरुणीला तब्येत खराब असल्यामुळे नीट चालता येत नव्हते तेव्हा ओळखीच्या डॉक्टरांसोबत तिला ससून रुग्णालयात पाठवले. तेव्हाचे सीसीटीव्ही तपासा, असे चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र, ससूनमध्ये चांगले उपचार होत नसल्याचे कारण देऊन ही तरुणी जहांगीर रुग्णालयात गेली. तिथून तिने उपचारांसाठी पैसे मागितले तेव्हाही तिची गरज ओळखून पैसे दिल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
आज ही तरुणी चित्रा वाघ विरुद्ध बोलायला लागली तेव्हा अगदी सगळ्या महिला नेत्या बोलायला पुढे आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये या तरुणीला मदतीची गरज होती तेव्हा कोणीही आलं नव्हतं. तेव्हा सोबत कोणीही नव्हतं हे त्या तरुणीने सांगितल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच आता ही तरुणी खोट का बोलत आहे हे माहित नाही. देव तिचं भलं करो असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
हे ही वाचा:
सोमाय्यांच्या घराबाहेर पोलिसांची नोटीस
प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर
तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप
नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले
हे असं सगळं करून माझा आवाज बंद कराल असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणासंदर्भातल्या चौकशीला सामोरी जायला तयार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तरुणी जे बोलत आहे त्याचा तपास करा. पीडीतेने जे मेसेज मला पाठवले ते तसेच मी गृहमंत्र्यांना पाठवले, असे चित्रा वाघ म्हणाल्या. पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी त्यांचे आणि तरुणीचे मेसेज वाचून दाखवले. या मेसेजमध्ये ही तरुणी जीव संपवण्याची भाषा करत असल्याचे त्यांनी उघड केले. तेव्हा या तरुणीची समजूत काढल्याचे त्या म्हणाल्या.
या तरुणीसाठी तिची आपबीती ऐकल्यानंतर जे करता आलं तेवढं केल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच हा एक नवीन अनुभव असून या प्रकरणात तिला दोष देणार नाही. मात्र, आता सत्य समोर आणायचे आहे, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. ही तरुणी वर्षा बंगल्यावर जाऊन जीव देणार होती. मात्र, आता या तरुणीबद्दल आणखी काही बोलून तिच्या अडचणी वाढवायच्या नाहीत. आजही मी तिच्या सोबत आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. आता या तरुणीच्या पाठीशी उभे राहिलेल्यांनी तिला न्याय मिळवून द्यावा आणि तिला न्याय मिळावा असेही चित्रा वाघ म्हणाल्या.