महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि महा विकास आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या कोकण पट्ट्यात दौरा करत आहेत. कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत तिथल्या नागरिकांशी आदित्य ठाकरे हे संवाद साधत आहेत. पण यावेळी राज्याची जनता आदित्य ठाकरेंवर चांगलीच संतापताना दिसत आहे. चिपळूण भागात फिरणाऱ्या आदित्य ठाकरेंवर तिथले स्थानिक नागरिक चांगलेच कडाडले.
गुरुवार, २९ जुलै रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकणात दाखल झाले. पण त्यांच्या या दौऱ्या दरम्यान त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त कोकणी नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यवर प्रश्नांचा भडीमार केला. ज्याची उत्तरे आदित्य ठाकरे यांच्याकडे नव्हती. अखेर आदित्य ठाकरे यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.
हे ही वाचा:
शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात
‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’
रंगकर्मीं का रागावले आहेत? जाणून घ्या कारणे…
पर्यावरण खात्याचे मंत्री आहात पण कोकणात काय चालले आहे? तिथे परिस्थिती काय आहे? हे पाहायला तुम्ही येत नाही असं म्हणत चिपळूणकरांनी आदित्य ठाकरे यांना चांगलेच फैलावर घेतले.
इथे आमच्या भागातील पूल वाहून गेले आहेत. तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री पण कधी तरी येता का? कधी तरी येता, महिन्यातून एक फेरी तरी होते का तुमची? असा संतप्त सवाल या नागरिकांनी आदित्य ठाकरे यांना केला.
पहिले नदीतील गाळ साफ करायला सांगा. त्याशिवाय हे पाणी भरायचे थांबणार नाही असा सल्लाही नागरिकांनी यावेळी दिला. हे सगळं ऐकताना आदित्य ठाकरे हे वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होते. ‘मी ते काम करायला सांगतो’ असे म्हणत आदित्य यांनी तिथून काढता पाय घेतला.