भारतीय भूभाग आपला असल्याचा चीनचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चीनने सोमवारी अधिकृतपणे त्यांच्या नकाशाची सन २०२३मधील आवृत्ती प्रसिद्ध केली. यात चीनने अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन प्रदेश तसेच तैवान आणि विवादित दक्षिण चीन समुद्र यांसह वादग्रस्त प्रदेश आपल्या नकाशात दाखवले आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्यानंतर भारताने हे भाग भारताचे अविभाज्य भाग होते आणि यापुढेही राहतील, असे ठणकावले आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘चीनने नकाशात जे क्षेत्र स्वत:चे म्हणून दाखवले आहे, ते त्यांचे नाही, असे करण्याची चीनची जुनी खोड आहे. अक्साई चीन आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. यापूर्वीही चीनने भारताचे काही प्रदेश आपले असल्याचे दाखवून नकाशे काढले आहेत. त्यांच्या दाव्याने काहीही होत नाही. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. दुसऱ्याची क्षेत्रे आपली आहेत, असे निरुपयोगी दावे करून काहीही होत नाही,’ असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.u
हे ही वाचा:
ब्रिक्स परिषदेदरम्यान नेते मोदींच्या शेजारी बसू पाहात होते!
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून सादर
कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर
नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या जी २० परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीला येणार असतानाच हा नकाशा प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गलवान खोऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे या बैठकीत तरी ती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र चीनच्या या खोडसाळपणामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत.