इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ११९ जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. खराब हवामानामुळे सर्व प्रकारची यंत्रणा असूनदेखील ती वापरता आली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. वाडीवर जाण्यासाठी आणि यंत्रणा पोहोचवण्यासाठी रास्ता नाही, सतत पाऊस, धुके यामुळे अनंत अडचणी आल्या. तरीही एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करून प्रसंगी जीव धोक्यात घालून बचावकार्य केल्याचे ते म्हणाले. याशिवाय राज्यात दरड प्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या ठिकाणांचा आणि ज्या ठिकाणांचा समावेश नाही अशा ठिकाणांची माहिती घेऊन स्थानिक पातळीवर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसा अहवाल देण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना सांगितले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या संदर्भात आज मंत्रीमंडळ बैठकही पार पडली.
मुख्यामंत्री शिंदे म्हणाले, सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. काही लोक अडकल्याची शक्यता आहे. गुरूवारी दिवसभरात एकूण ११९ लोकांना वाचवण्यात यश आलं. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. आतापर्यंत या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे. वाचलेली कुटुंबे, मृतांचे नातेवाईक यांची सर्व व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तेथील शाळा आणि कंटेनरच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ४०८ मुलांची सुटका
पुरातत्त्व खात्याला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी
मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के; अर्थात २० कोटी
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार
बचाव कार्य थांबवलेले नसून ते सुरूच आहे. लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली, गिरीश महाजनांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले, इर्शाळवाडीमध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी काम करत असलेली यंत्रणा जीव ओतून काम करत आहे. जो पर्यंत त्यांची कायमस्वरूपी सोय होत नाही तोपर्यंत त्यांना मदत केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. सीडकोला त्या ठिकाणी लोकांना कायमस्वरूपी घरं बांधण्याचा आदेश दिला आहे. या लोकांना सर्व त्या सोई उपलब्ध करून देण्यात येतील.