अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या भाषणातून विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षाचे एकच असते. एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच. एकाच स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो. त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत,” असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी कांगावा करणे हास्यास्पद
“सरकार चुकत असेल, तर टीका करा. पण, मुद्दा नसेल तर अपशब्द वापरून आरोप करायचे. मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचे. थयथयाट करायचा. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं हे रोज सुरू आहे. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारे कांगावा करणे हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकली, विचारधारा विकली. सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं, ही कुठली भूमिका आहे,” अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे. आम्हाला खोके-खोके म्हणणाऱ्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतलेत. त्याचीच आता चौकशी सुरू आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
काहींनी विधिमंडळाचे कामकाजही घरी बसून फेसबुकवर लाईव्ह केलं असतं
“अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यात धन्यता मानतात. सभागृहात न बोलता बाहेर मीडियात जास्त बोलण्यात आपला आनंद समजतात. विधिमंडळाचे कामकाज घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर तेही केलं असतं,” अशी सडकून टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
राज्यात आणि देशात मोदी गॅरंटीवर विश्वास
“राज्यात आणि देशात आता मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. त्याचमुळे अजित पवार आणि अशोक चव्हाणही आमच्यासोबत आले आहेत. यामुळे आणखी काय काय होईल याची चिंता विरोधकांना आहे. त्यामुळे सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला नेता दुपारी आपल्यासोबत राहील की नाही, याची गॅरंटी नाही,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकासाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण, विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने एक्स्प्रेस वे वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करत आहोत, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? असे विचार मांडणाऱ्यांकडून काय अपेक्षा?
एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, “तुम्ही ५० हजार दिले नाही, आम्ही खात्यावर जमा केले, तुम्ही केवळ पोकळ घोषणा केल्या. आमचं काम भरीव आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आहेत आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तुम्ही फक्त त्यांना पोकळ आश्वासने दिली. पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी स्थिती आहे,” अशी वस्तुस्थिती सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते की, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार. त्यांना कसे प्रश्न समजणार आणि कसे प्रश्न सोडवणार? अडीच घरं चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या सरकारने सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते. आम्ही ते सुरू केले. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी योजनांना चालना दिली आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
दुर्दैवी घटनांचं राजकारण करणं जास्त दुर्दैवी
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पण, गुन्हेगारी आणि गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही. पण, दुर्दैवी घटनांचं राजकारण करणं त्यापेक्षा जास्त दुर्दैवी आहे. ज्यांच्या कार्यकाळात खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले. पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी खंडणीखोरी व्हायची, ते रॅकेट पकडलं, अशी जोरदार टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकून देशद्रोहाचं कलम लावलं. केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उचललं. खासदार- आमदारांना जेलमध्ये टाकलं. पत्रकारांना टाकलं, अर्णब गोस्वामीला टाकलं. कंगना रणौतचं घर तोडायला महापालिकेचे ८५ लाख रुपये खर्च केले. हा काय अंहकार आहे? देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण केलं,” असे सगळे मुद्दे मांडत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.
हे ही वाचा:
रामलल्लाची मूर्ती कठीण कसोटीतून साकारली
“फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्यात”
स्वामी समर्थतर्फे व्यावसायिक कबड्डी ५ मार्चपासून
पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाप्रकरणी एक जण ताब्यात
उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवल्यावर उद्योग राज्यात कसे येणार?
“उद्योग पळवले अशी कोल्हेकुई सुरू आहे. पण ते आधीच पळाले होते. उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवतात. जिलेटिन ठेवल्यानंतर जेव्हा पोलिसांवर आरोप झाला, तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले की, अरे तो वाझे काय लादेन आहे का? नंतर निघाला तोच लादेन. त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडे. कसे लोक राहतील इकडे? आता उद्योग राज्यात येऊ लागले आहेत. दावोसला १ लाख ३७ हजारांचे सामजंस्य करार झाले. ८० टक्के कार्यवाही सुरू झाली आहे. यावेळस ३ लाख ७३ हजार कोटींचे सामजंस्य करार झाले,” असं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.