मणिपूर हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मागितली माफी

आगामी वर्षात राज्यात स्थिती पूर्ववत होण्याचा व्यक्त केला विश्वास

मणिपूर हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मागितली माफी

वांशिक वादाच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्यात मोठा हिंसाचार उसळला होता. या काळात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. अशातच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच आगामी वर्षात संपूर्ण राज्यात स्थिती पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री सिंग यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमधील लोकांची माफी मागितली आणि सर्वांना भूतकाळ माफ करा आणि विसरा असे आवाहन केले. पुढे ते म्हणाले की, हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी गेले. गेल्या ३ मे पासून आज जे काही घडत आहे त्याबद्दल मला खेद व्यक्त करायचा आहे. अनेकांनी प्रियजन गमावले. अनेकांनी आपली घरे सोडली. मला वाईट वाटत आहे. मी माफी मागतो. परंतु, आता आशा आहे की, गेल्या तीन ते चार महिन्यांतील शांततेच्या दिशेने प्रगती पाहिल्यानंतर, २०२५ मध्ये राज्यात स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास बिरेन सिंग यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन करून मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणाले, मला राज्यातील सर्व समुदायांना आवाहन करायचे आहे की, जे काही घडले ते घडले आहे. आपल्याला आता भूतकाळातील चुका विसरून नव्याने जीवन सुरू करावे लागेल. शांततापूर्ण मणिपूर, समृद्ध मणिपूर यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे.

हे ही वाचा..

खोदकामादरम्यान संभलमधील पायरीच्या विहिरीचा दिसला दुसरा मजला!

अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण

भ्रष्टाचार के तीस मार खान; दिल्लीत भाजपाकडून आपविरोधात बॅनरबाजी

येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार

मणिपूरमध्ये २०२३ पासून मैतेई आणि कुकी यांच्यातील वादाला सुरुवात झाली. पुढे २०२४ मध्ये हा वाद वाढत जाऊन याला हिंसक वळण मिळाले. हिंसाचारात २५० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो विस्थापित झाले आहेत. केंद्र सरकारने या हिंसाचाराची दखल घेत अनेक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या संवेदनशील झोनमध्ये सैन्य तैनात केले आहे ज्यामुळे या भागात गोळीबाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, कांगपोकपी आणि चुराचंदपूर येथे २,०५८ विस्थापित कुटुंबांचे त्यांच्या मूळ घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील हिंसाचार रोखण्यासाठी, सरकारने NH-2 (इम्फाळ-दिमापूर) आणि NH-37 (इम्फाळ-सिलचर मार्गे जिरिबाम) वर अनुक्रमे १७ आणि १८ अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कंपन्या तैनात केल्या आहेत.

Exit mobile version