अपघातग्रस्त कुटुंब म्हणाले, एकनाथजींच्या रूपात विठ्ठल आला!

अपघातग्रस्त कुटुंब म्हणाले, एकनाथजींच्या रूपात विठ्ठल आला!

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले आणि राज्यात कामाला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, ते २४ तास जनतेची सेवा करणार. हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून येत आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अमोल जाधव यांच्या कुटुंबाच्या मदतीला मुख्यंमत्री शिंदे धावून गेल्याचे नुकतेच समोर आले आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कुटुंबाला शिंदे यांच्याकडून मिळालेल्या मदतीची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.

सातारा जिल्ह्यातील जाधव कुटूंब उदरनिर्वाहासाठी बिहारमध्ये वास्तव्यास आहे. शनिवार, १६ जुलैच्या मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन कुटुंबातील चारहीजण गंभीररित्या भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णांची परिस्थिती बघता तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एअर अ‍ॅम्ब्युलन्स कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. तसेच हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, यामुळे जाधव यांचे नातेवाईक हतबल झाले. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला.

त्यावेळी जाधव यांच्या एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांनी हकीकत ऐकताच लगेच कामाला लागले. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ शासकीय एअर अ‍ॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींचा फोटो कचऱ्यात, कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!

पुलवामात भ्याड दहशदवादी हल्ला, एक जवान शहीद

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुखयमंत्री शिंदेंनी स्वखर्चातून दोन एअर अ‍ॅम्ब्युलन्स बुक केल्या. त्या कुटुंबाला दिवस उजाडण्याच्या आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले. सध्या या कुटुंबाला पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळेवर मदत केल्याने जाधव यांचे कुटुंब मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिल्याची भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत होते.

Exit mobile version