नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून येत असतात. सिने कलाकार, क्रिकेटपटू, राजकीय नेतेही मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईला येत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार आशिष शेलारही उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गणेशोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी सोमवारी ९ सप्टेंबर रोजी सकळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. गेल्यावर्षीही अमित शाह यांनी सहकुटुंब लालबाग राजाचे दर्शन घेतले होते. दरम्यान अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण वाळकेश्वर परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. तर, संपूर्ण परिसरात बंदोबस्त करण्यात आला होता यामुळे या परिसराला छावणीचे रूप प्राप्त झाले होते.
हे ही वाचा:
शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन
सोनसाखळी चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक
हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?
लालबागचा राजाला दाखल होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी त्यांनी तेथील गणपतीचे दर्शन घेतले. तर, अमित शाहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर शाह यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. पुढे अमित शाह दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगमी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.