राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बुधवार, ५ जुलै रोजी अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. कोणत्या बैठकीला जास्त संख्या असेल याकडे लक्ष असताना अजित पवारांच्या बैठकीला ३२ नेत्यांनी हजेरी लावली तर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला १६ नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांच्या सोबत गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षातील फुटीचं कारण स्पष्ट करताना आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदार आणि समर्थकांच्या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. त्यांना पक्षातील बडव्यांनी घेरलं आहे. त्यांना दूर करा आम्ही सोबत येऊ अशी आवाहनात्मक हाक छगन भुजबळ यांनी दिली. हा आरोप करताना त्यांनी स्पष्टपणे कोणाचीही नावे घेतलेली नाहीत.
“साहेब, तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. वसंतदादांनाही वाईट वाटलं असेल. मी तुमच्याकडे आलो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांना असंच वाईट वाटलं होतं. धनंजय मुंडेंना तुम्ही पक्षात घेतलं, तेव्हा काका असलेले गोपीनाथ मुंडे आणि बहीण असलेली पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले होते. साहेब काहीच बिघडलेलं नाही. आमच्यावर केसेस आहेत म्हणून गेलो नाही. तुमच्याभोवती बडवे आहेत म्हणून गेलो. तुम्ही आवाज द्या बडव्यांना बाजूला करा आम्ही एकत्र यायला तयार आहोत,” असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं.
“पक्ष स्थापन झाला तेव्हा मी पक्षाचा अध्यक्ष झालो. नंतर उपमुख्यमंत्री झालो त्यामुळे पद सोडलं. आताचे अध्यक्ष साडेपाच वर्षांपासून आहेत. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सगळ्या निवडणुका होतात. परंतु प्रांताध्यक्षांची निवडणूक होत नाही. तुम्ही हलणार नाहीत, पण भाकरी फिरवायची म्हणणार; जे आहे ते फिरवावं लागेल ना” अशी टीका भुजबळ यांनी जयंत पाटलांवर केली.
हे ही वाचा:
समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल
वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह
शस्त्रे लुटण्यासाठी आलेल्या जमावाला लष्कराने रोखले; एक ठार
अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक
रविवार, २ जुलै रोजी अजित पवारांनी बंड करत भाजपा – शिंदे गटाच्या साथीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह इतर नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र उभे राहिले आहे.