छगन भुजबळांकडून मोदी सरकारचे कौतुक

छगन भुजबळांकडून मोदी सरकारचे कौतुक

राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यात संचारबंदीसह अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक आर्थिक पॅकेजही देऊ केलंय. पण हे पॅकेज गरीबांच्या तोंडाला पानं पुसणारं असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावरुनही भाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना ३ किलो गहू, आणि २ किलो तांदूळ देण्यात येणार असल्याची घोषणा केलीय. त्यानंतर भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं एक पत्र समोर आलंय. गेल्या वर्षी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ महाराष्ट्रात यशस्वी ठरल्याचं भुजबळांनी आपल्या पत्रात म्हटलंय. तसंच महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेत मदतीचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केलीय.

हे ही वाचा:

शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात

पुण्यातील व्यापारी लॉकडाऊन विरुद्ध उच्च न्यायालयात

राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?

योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

भुजबळांच्या या पत्रावरु भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. “केंद्र सरकार कोणताही दुजाभाव न ठेवतां सर्व मदत करत आहेच. राज्य सरकारने मदत घ्यायची वर केंद्र मदत करत नाही असा कांगावा करत फिरायच वर आता परत केंद्राने मदत द्यावी म्हणून विनंती करायची. गेल्या वर्षी एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या ८ महिन्यांच्या काळात फेज १ आणि २ मधील ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ महाराष्ट्रात मोठी यशस्वी ठरली, हे सांगत आहेत दस्तूरखुद्द छगन भुजबळ. वाचा पत्र” असं खोचक ट्वीट उपाध्ये यांनी केलं आहे.

Exit mobile version