राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने मनुस्मृती सोडावी. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली. मात्र महाविकास आघाडीतील बाकी घटकांना हे माहित नाही. नाना पोटोले देखील बोलले त्यांना हे मान्य नाही. महाविकास आघाडी याबाबत काही निर्णय येईल मला याबाबत काही बोलायचे नाही. कितीही किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली तरी भाजपला अडचण येणार नाही. हे आमच्यासाठी नवीन नाही असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
बावनकुळे आंबेडकरांवर निशाणा साधताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षामध्ये सर्वात जास्त आदिवासी क्षेत्रांमध्ये काम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा स्वीकार करुन त्यांना अभिप्रेत असलेले शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकवेळा तोडले. मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या कुठल्याही कलमात सुधारणा केली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस समोर नेत आहेत. हा विचार प्रकाश आंबेडकरांनी करायला हवा. तरी देखील तुम्ही व्यक्तिगत विरोधी म्हणून राजकारणासाठी अशी टीका करत असाल तर हे दुर्दैवी आहे अशी टीकाही त्यांनी केली.
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा झाली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते या युतीला अनुकूल असतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यानंतर या शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन
१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी
लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण
पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
शरद पवारांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी जपून बोलावे
शरद पवार हे भाजपसोबत असल्याचा गौफ्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे . शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आंबेडकर याना या वक्तव्यावरून सुनावले आहे. शरद पवार हे देश तसेच राज्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे पवारांविषयी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत. शरद पवार हे भाजपचेच त्यांचे हे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. मविआ नेत्यांबद्दल बोलतानाही प्रकाश आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. यावर बोलताना आंबेडकर यांनी संजय राऊत यांनी दिलेला सल्ला मला उद्धव ठाकरेंनी दिला तर मानेन, असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे एकूणच या नव्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये निवडणूक होण्याआधीच समन्वयाची वानवा असल्याचे दिसून येत आहे.