उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुळाचा उल्लेख करत टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमचं बावनकुळे हे कुळ हिंदुत्ववादी आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे ठाकरे कुटुंबीयांना उंची दिली, त्या कुळाला उंची दिली ते कूळ तुम्ही बुडवलं आहे, असा जोरदार घणाघात करत बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या विधानाची सालटी काढली आहेत.
उद्धव ठाकरे वारंवार माझ्या कुळाचा उल्लेख करतात.आतापर्यंत त्यांनी तीन वेळा कुळाचा उल्लेख केला कधी बावन्नकुळे म्हटलं साधी एकशे बावन्नकुळे म्हटली. माझ्या कुळाचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंचे फ्रस्ट्रेशन जात आहे तर चांगले आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो आमचं बावनकुळे हे कुळ हिंदुत्ववादी आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती ते कूळ तुम्ही बुडवलं आहे. एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. नुसत्या सभेतूनच वल्गना करू नका अशा कडक शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मालेगावच्या सभेतच उद्धव ठाकरे यांना अचानकपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाबद्दल उपरती झाली. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी याना निक्षून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या या सावरकर विधानाचे बावनकुळे यांनी टोक काढले. बावनकुळे म्हणाले , उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेस पार्टीने पन्नास वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल टीका केली, अपमान केला. पण सत्तेमध्ये उध्दव ठाकरे राहिले ते मुख्यमंत्री पद टिकवण्याकरता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं नाही.
हे ही वाचा:
तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे
आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू
विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी
कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी
आहे का धमक? नुसत्या तोंडाच्या वाफा काढू नका
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पार्टी असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला गेला आताही केला. त्यापूर्वी पन्नास वेळा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये धमक असेल त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही वाटत असेल तर उद्या सकाळी ११ वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतोय सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे सांगावे. आहे का धमक? नुसत्या तोंडाच्या वाफा काढू नका, असेही बावनकुळे यांनी सुनावले.
सवय नसलेल्यांनी निवडणुकीच्या गोष्टी करू नयेत
उद्धव ठाकरे यांना कधीही लोकसभा, विधानसभा लढता आली नाही. जनतेत एक तरी निवडणूक लढले का? मागच्या दराने एन्ट्री केली त्यांनी सभागृहामध्ये. त्यांना निवडणूक माहित नाही. त्यांनी लोकसभा विधानसभा लढली नाही. जनतेमध्ये कधी मत मागितली नाही. निवडणूक लढवण्याची सवय नसलेल्यांनी निवडणुकीच्या गोष्टी करू नयेत. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील २०० जागा जिंकून येऊ, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.