‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे रविवारचे भाषण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल. नाना पटोले यांचा हेतू काय आहे. देशातील सर्वोच्च पदावरच्या नेत्याला काही बोलले की प्रसिद्धी मिळते, अशी त्यांच्या नेत्यांची पॉलिसी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधला यावरून उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या भाषणात थयथयाट आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. त्यांची सगळी भाषणं ही सारखीच असतात. दसऱ्या मेळाव्यातही ते सारखेच बोलले होते. तशाच पद्धतीचे ते काल बोलले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. नैराश्य व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नसल्याचे ते म्हणाले. आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालला आहे तेव्हा असा थयथयाट केला जातोय, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?

‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’

पोटात लपवल्या होत्या हेरॉईनच्या ३८ गोळ्या

मुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर?

अरे, तुझे बाबा भेटायला तयार नसतील, तर राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांना भेटणार ना, असा टोला त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांचा फक्त एकदा फोन आला. वेगवेगळ्या मार्गाने आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला. मेल पाठवले. पण, एकदाही उत्तर आले नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ईडी- सीबीआयविषयी बोलताना ते म्हणाले की, जर कर नाही त्याला डर कशाला. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version