‘नाना पटोले यांच्या विरोधात राज्यपालांकडे आणि न्यायालयात दाद मागणार’

‘नाना पटोले यांच्या विरोधात राज्यपालांकडे आणि न्यायालयात दाद मागणार’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राज्यातील पोलीस हे दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. त्यामुळे नाना पटोलेंच्या वक्तव्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी म्हटले. जो न्याय नारायण राणेंना तो न्याय नाना पटोलेंना का नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्यात ‘हम करे सो कायदा’ असे चित्र असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आता काशीचा घाट दाखवतील. काशीचा घाट म्हणजे मृत्यू. पटोले म्हणतात मोदींना मारतो, मलिक म्हणतात फडणवीसांना काशीचा घाट दाखवू. राज्यात काय दहशतवाद सुरु आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

हे ही वाचा:

चित्ररथाबाबत राजकारण होऊ शकते?

भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!

कोरोना काळात आयातीला ‘सोन्याचे दिवस’

गावित बहिणींची फाशी रद्द, आता मरेपर्यंत जन्मठेप

२२ जानेवारीला राज्यपाल आणि लोकायुक्तांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावर लावलेला दंड आणि व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारण पद्धत असते की, फाईलवर शेरा लिहायचा असतो. पण इथे आपल्याला कोण अडवणार अशा तोऱ्यात निर्णय झाला. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. तसेच सर्व मंत्रिमंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केले होतं. त्यानंतर राज्यभरातून टीका झाल्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोलत होतो असे ते म्हणाले. यानंतर भाजपकडून राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले.

Exit mobile version