आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे गैरहजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या पदाचा चार्ज इतर कोणाला द्यावा आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी विरोधी पक्षाकडून अनेकदा करण्यात येत आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बहुदा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावरही विश्वास नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते उपस्थित नाहीत हे स्वाभाविक आहे. परंतु, परंपरेनुसार त्यांनी इतर कुणालातरी या पदाचा चार्ज द्यावा. मात्र, त्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास नसल्यामुळे हा चार्ज अजुनही देण्यात आलेला नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना जर त्यांच्या पक्षात कोणावर विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. मात्र, त्यापूर्वी त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. मुख्यमंत्री हे आदित्य ठाकरेंनाही चार्ज देऊ शकतात. आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्र्यांनी चार्ज दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून श्रीगणेशा
जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात
… म्हणून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ
अजूनही त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिलेला नाही म्हणजे त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. परीक्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. बहुदा मंत्रालयापर्यंत याचे धागेधोरे घेऊन जाणारे आहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलीस कशी काय चौकशी करणार. त्यामुळे आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार तरी आहे की नाही? की तोंड दाबून ठेवणार आहात? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी सरकारला केला आहे.
मुख्यमंत्री सध्या गैरहजर असण्यावरून सरकारवर टीका होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींचे मुखदर्शन होत नसल्याचे म्हटले होते. मोदींचे मुखदर्शन झाले नसले, संसदेत आले नसले तरी सगळ्या बाजूंनी ते अॅक्टीव्ह आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना उत्तर दिले आहे.