चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

‘आप’चे तीन नगरसेवक भाजपात दाखल

चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

३० जानेवारी रोजी झालेल्या चंडिगढच्या महापौरपदाच्या निवडणुकीत प्रशासनाने नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी आठ नगरसेवकांच्या मतांना अवैध घोषित केले होते. त्यानंतर भाजपच्या मनोज सोनकर यांना महापौर बनवले गेले. मात्र आघाडीने या निर्णयाला आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज, सोमवारी याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, रविवारी रात्री महापौर मनोज सोनकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी मल्होत्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

महापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी कथितपणे अवैध घोषित केलेल्या नगरसेवकांच्या मतांवर खाडाखोड करताना दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी चंडिगढ प्रशासनाला फटकारले होते आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी ठेवली होती.

आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपकडे आता १४ ऐवजी १७ नगरसेवक आहेत. आम आदमी पक्षाच्या दोन महिला नगरसेवकांसह तीन नगरसेवक शुक्रवार रात्रीपासूनच बाहेर होते. शनिवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेश: पंतप्रधान मोदींनी कल्की धाम मंदिराची केली पायाभरणी!

“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय

एका नगरसेवकाने लग्नाला जायचे असल्याचे सांगितले होते, तर दुसऱ्याने पक्षात आपण नाराज असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. मात्र शनिवारी त्यांचे फोन बंद होते. त्यानंतर पूनम देवी, नेहा मुसावत आणि गुरुचरण काला यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version