भारतात कोरोनाची दुसरी लाट चांगलीच फोफावताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसतोय. शनिवारी देशात एकूण १,४५,३८४ रूग्ण आढळले. यातील ५५,४११ रूग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. शनिवारी राज्यातील ५३,००५ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे. सध्या राज्यात सक्रीय रूग्णांचा आकडा ५,३६,६८२ इतका आहे. तर राज्यातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८२.१८% आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संबंधीचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक सुरु झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आदी नेते उपस्थित होते. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या बैठकीला अनुपास्थित होते. या बैठकीत लॉकडाऊनच्या दृष्टीने चर्चा झाली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत, पॅकेजबद्दल मात्र मौन
ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा
जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात
कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये टाका – भाजपा
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे असे म्हणत महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही असे मत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरा कोणताही उपाय नाही असेही मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे. लॉकडाऊन ही आता राज्याची गरज झाली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कडक निर्बंध आणि सूट असे दोन्ही एकत्र शक्य नाही. आपल्याला सध्या कडक निर्बंधात थोडी कळ सोसावी लागेल असे ते म्हणाले. पहिले आठ दिवस कडक लॉकडाऊन लावून टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी सुरु करायचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोरोनाचा गुणाकार थांबायला हवाय आणि त्यासाठी पुढच्या दोन दिवसांत अंदाज घेऊन आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.