उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले पाऊल

उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश

राज्यात पाचव्या टप्प्यात मुंबईच्या सर्व जागांवरील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. धीम्या गतीने होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला त्यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले होते. यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपाच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजपा नेते आशिष शेलारांनी यासंदर्भात तक्रार केली होती. राज्यात पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा जागांवर मतदान झाले होते. यावेळी मतदानाची प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याच्या काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती.

भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!

मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला

राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात आहे. मतदारांनी रांगा पाहून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. यावर भाजपा नेते आशिष शेलारांनी तक्रार केली होती. ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी भाजपावर बिनबुडाचे आरोप करत निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी आणी दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.

Exit mobile version