जम्मू काश्मिरच्या विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आता केंद्र सरकारने लडाखमधील पक्षांना चर्चेसाठी बोलावल्याची खात्रीलायक बातमी आहे. कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या वतीनं शनिवारी कारगिरमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने १ जुलै रोजी दिल्लीमध्ये ही बैठक बोलावली आहे अशी माहिती देण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार नसून केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी चर्चा करणार आहेत.
केंद्रीय गृह सचिवांनी लडाखमधील विविध पक्षांना फोन करुन या चर्चेचं निमंत्रण दिल्याचं समजतंय. पण केंद्र सरकारच्या वतीनं चर्चेची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नाही. ही चर्चा १ जुलै रोजी होणार आहे असं कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा परत मिळावा अशी मागणी तिथल्या सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. तशाच प्रकारे, लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी लडाखच्या नेत्यांनी केली आहे. जर १९७५ साली केवळ अडीच लाख लोकसंख्या असणाऱ्या सिक्कीमला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळत असेल तर तसाच दर्जा लडाखला का मिळू नये असा सवालही लडाखच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे या बैठकीत कलम ३७०, कलम ३५अ आणि राज्याच्या दर्जावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी (२४ जून) जम्मू काश्मीरमधल्या आठ पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक झाली. ही बैठक सकारात्मक वातावरणात चर्चा झाल्याचा उल्लेख सगळ्याच नेत्यांनी केला. सोबतच या बैठकीनदरम्यान पंतप्रधानांनी लवकरच विधानसभा निवडणूक घेण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं.
बैठकीत सामिल झालेल्या नेत्यांनी जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्याची मागणी केली. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कलम ३७० वर चर्चा केली. त्याच सोबत संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, निवडणूक घ्यावी, काश्मिरी पंडितांची वापसी, सर्व राजकीय नेत्यांची नजरकैद संपवण्यासोबत नागरिकांना जमीन तसंच रोजगाराची खात्री द्यावी अशा महत्वाच्या मागण्यात पंतप्रधानांकडे करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांनी वाढ
मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल
इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या या बैठकीला नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आजाद, गुलाम अहमद मीर, ताराचंद, पीडीपीच्या महबूबा मुफ्ती, भाजपाचे निर्मल सिंह, कविन्द्र गुप्ता आणि रवींद्र रैना, पीपल्स कॉन्फरन्सचे मुजफ्फर बेग आणि सज्जाद लोन, पँथर्स पक्षाचे भीम सिंह, सीपीआयएमचे एमवाय तारीगामी, जेके अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी सहभागी झाले होते.