परमबीर सिंह विरुद्धच्या गुन्ह्यांची चौकशी सीबीआय करणार

परमबीर सिंह विरुद्धच्या गुन्ह्यांची चौकशी सीबीआय करणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आता सीबीआयकडून चौकशी होणार आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्धच्या कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या पाच प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्र पोलिसांकडून आपल्याकडे घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी गेल्या महिन्यात आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेने मंगळवारी उशिरा या प्रकरणात गुन्ह्यांची नोंद केली. मुंबई व ठाण्यात नोंदवण्यात आलेले पाचही गुन्हे सीबीआयने स्वत:ची प्रकरणे म्हणून आणि आपल्या प्रक्रियेनुसार पुन्हा दाखल केले आहेत.

परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये खंडणी गोळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर यांनीही मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी ठाणे आणि मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले होते.

हे ही वाचा:

… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

पाकिस्ताननंतर श्रीलंकेच्या संसदेत येणार अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या सर्व आरोपांचा महाराष्ट्र पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर हा तपास थांबवण्यासाठी परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तपास सीबीआयकडे सोपविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवण्याचे तसेच ठाणे व मुंबई पोलिसांनी दाखल केलेलं सर्व एफआयआरदेखील सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश २४ मार्च रोजी दिले होते.

Exit mobile version