तृणमूल कॉंग्रेसच्या म्हणजेच टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून कारवाई सुरू आहे. सीबीआयकडून पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. शनिवार २३ मार्च रोजी सकाळीचं सीबीआयकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.
सीबीआयचे पथक महुआ मोईत्रा यांच्या संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकण्यासाठी पोहोचली आहे. रोख रकमेप्रकरणात कारवाईसाठी सीबीआयची टीम कोलकाता येथील महुआ मोईत्रा यांच्या अलिपोर भागात आणि इतर अनेक ठिकाणी पोहचली आहे. माहितीनुसार, सीबीआयचे एक पथक मोईत्रा यांच्या वडिलांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. तसेच सीबीआय महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. शिवाय सोबतच कॅश फॉर क्वेरी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांची चौकशी करण्याचे आणि सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश लोकपालने मंगळवार, १९ मार्च रोजी सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयकडून कारवाईला वेग आला आहे.
हे ही वाचा:
केट मिडलटन यांना कर्करोग; व्हिडीओतून दिली उपचारांची माहिती
२० वर्षांपासून फरार असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण
पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
महुआ मोईत्रा यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे महुआ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. महुआ यांनी अदानी यांच्याविरोधात संसदेत प्रश्न विचारण्यासाठी दुबईतील व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या होत्या, असे तक्रारीत म्हटले होते. मात्र, मोईत्रा यांनी हे दावे फेटाळून लावले असून अदानी समूहाच्या सौद्यांविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.