गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी अटळ?

गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी अटळ?

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून सीबीआय चौकशीची मागणी करतानाच त्यांच्याजवळ या संबंधीचा ६.३ जीबीचा डेटा असल्याचेही सांगितले आहे. हा डेटा घेऊन ते दिल्लीला केंद्रीय गृह सचिवांना भेटायला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे १७ फेब्रुवारीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आल्याचे सांगितले. तसेच त्याचा पोलिसांकडे रेकॉर्ड असल्याची माहितीही त्यांनी पुरवली. १५ फेब्रुवारीलाच अनिल देशमुख हे खाजगी विमानाने मुंबईला आल्याचेही ते म्हणाले, त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेली माहिती खोटी असल्याचंही सिद्ध होत आहे असे फडणवीस म्हणाले. पवारांना गृहमंत्री अनिल देशमुखांची पाठराखण करण्यासाठी चुकीची माहिती पुरवली गेली, असा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा:

फोन टॅपिंगमुळे उघड झाला पोलिसांच्या बदल्यांचा धंदा

अनिल देशमुखांची लवकरच गृहमंत्री पदावरून हकालपट्टी?

पवार साहेब सांगतील ते ब्रह्मवाक्य

सचिन वाझेची ‘ती’ डायरी एनआयएच्या हाती

मुंबईमध्ये रश्मी शुक्ला या कमिश्नर ऑफ इंटेलिजन्स (सीओआय) असताना त्यांनी पोलिसांच्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अहवालही ८ ऑगस्ट २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला आणि यावर कोणतीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांनी सरकार वाचवण्यासाठी या प्रकारावर पांघरूण घातल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं त्या सीओआय रश्मी शुक्ला यांना अडगळीच्या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलं. प्रमोशन दिल्याचं भासवण्यात आलं. तर ज्यांचा या प्रकरणात हात होता त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आलं. त्यामुळे सुबोधकुमार जैस्वाल यांनी या पोस्टिंगला विरोध केला. तेव्हा दबावात हे सर्व होतंय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी केंद्रीय डेप्युटेशन मागून घेतलं, असा दावा फडणवीस यांनी केला. आता हा सर्व डेटा घेऊन देवेंद्र फडणवीस दिल्लीला गृहसचिवांना भेटणार आहेत. या भेटीतही ते सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे शक्यता आहे.

Exit mobile version