राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सीबीआयने ही धडक कारवाई केली आहे. गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात खरे कारण घेण्या मागचे नेमके कारण अजून समोर आले नाही. तरीदेखील या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
अनिल देशमुख हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी देशमुख यांची चौकशी सुरू आहे. तर त्यांच्या संपत्तीवर जप्तीही आणण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात असतानाच आता देशमुखांच्या जावयाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा:
बापरे! घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी मृत्यू
झकास! भारताच्या मधनिर्यातीची अशीही हाफ सेंच्युरी!
मंदिरे खुली करू नका, असे केंद्राने कुठे सांगितले?
भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा
वरळी येथून सीबीआयच्या पथकाने अनील देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले आहे. गौरव चतुर्वेदी यांच्यावरही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात करण्यात आली आहे? हे अद्यापही अस्पष्ट आहे. तर सीबीआयने चतुर्वेदी यांना अटक केली आहे का? या संदर्भातही कोणतीही ठोस माहिती अजून समोर आलेले नाही.
वरळी येथील सुखदा या निवास स्थानातून बाहेर पडत असतानाच सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यासोबत अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजते. सीबीआयच्या दहा जणांच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. पण या सर्व प्रकरणात देशमुख कुटुंबियांकडून मात्र चतुर्वेदी यांचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.