पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष आणि इतर शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. पण ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मात्र साधा नामोल्लेखही यात कुठेच करण्यात आलेला नाही.
शनिवार, १९ जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पण या कार्यक्रमात कोविड नियमावली पायदळी तुडविण्यात आली. या उद्घाटनाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. या संपूर्ण कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसला. तर जमलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही जणांनी तर चेहऱ्यावर मास्कही लावले नव्हते.
हे ही वाचा :
शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे
लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी
भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!
या जमलेल्या गर्दीवरूनच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, सरचिटणीस रोहन पायगुडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश कदम, बाळासाहेब बोडके यांच्यासह इतर शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल केला गेला आहे.