तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नरसंहाराचे आवाहन केल्याचे सोशल मीडियावर लिहिणारे भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी यांची ‘सनातन धर्मा’वरील अलीकडील टिप्पणी म्हणजे या धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के लोकसंख्येचा ‘नरसंहार’ करण्याची हाक आहे, असे मालविय यांनी लिहिले होते.
‘सनातन धर्म समूळ नामशेष झाला पाहिजे, असे उदयनिधी यांचे मत आहे. म्हणजे भारतात ८० टक्के लोक ज्या सनातन धर्माचे पालन करतात, त्या लोकांचा नरसंहार करण्यासाठी ही हाक आहे,’ असे मालविय यांनी सोशल मीडियावर लिहिले होते. द्रमुकचे नेते केएव्ही दिनकरन यांच्या तक्रारीवरून मालविय यांच्याविरोधात तमिळनाडूमधील त्रिचि येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३, १५३ (अ), ५०४ आणि ५०५ (१) (b) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले असूनही अमित मालविय हे राजकीय हेतूने जाणुनबुजून या भाषणाची मोडतोड करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजातील सौहार्दाला धोका पोहोचत आहे,’ असे या तक्रारीत नमूद केले आहे.
उदयनिधी यांनी नुकतेच ‘सनातन धर्मा’बाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेक हिंदुत्ववादी गट, भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माला केवळ विरोध करणे पुरेसे नाही, तर या धर्माचा समूळ नाश केला पाहिजे, असे विधान केले होते. तसेच, त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, डास, मलेरिया आणि करोनाशी केली होती. आपण या रोगांना विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाटच करावा लागतो. त्याचप्रमाणे या सनातन धर्माचा नायनाट करायला हवा,’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
हे ही वाचा:
नव्या तंत्रज्ञानासह जपानचे चांद्रयान अवकाशात झेपावले
स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी
‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम
ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित
या विधानानंतर गदारोळ माजल्यानंतर आपण कधीही सनातन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांविरुद्ध हिंसाचाराचे आवाहन केले नव्हते, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी दिले होते. मात्र ते त्यांच्या विधानावर ठाम होते आणि कोणत्याही कायदेशीर लढाईला तोंड देण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले होते. सनातन धर्मामुळे दु:खाच्या खाईत लोटल्या गेलेल्या वंचित समाजाच्या वतीने आपण हे विधान केले होते, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.