पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची आज पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नवनीत राणांचे चे अश्रू अनावर झाले.
मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात सुरु आहे,त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालंय. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहताहेत. तर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्यात. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली आहे.
नवनीत राणा यांनी भर चिखलातून, पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले.
हे ही वाचा:
लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?
कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?
पाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणारे का भेटले नवाज शरीफ यांना?
‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार
नवनीत राणा यांनी विदर्भातल्या नुकसानाच्या मुद्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पाहावी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जो पर्यंत मुख्यमंत्री अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला नुकसान झालंय हे कस कळणार, मदत कशी दिली जाणार असा प्रश्न थेट खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.